चिपळूण : मुंबईकडे जाणाऱ्या
आणि तिकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे दरवाजे आतून बंद करून ठेवले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे चिपळूण स्थानकावर आरक्षण असलेल्या प्रवाशांना देखिल आत प्रवेश करता येत नाही, परिणामी प्रवास न झाल्याने त्यांच्या तिकिटाचे पैसे वाया जात आहेत. या गंभीर प्रकाराकडे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी लक्ष वेधले असून, दरवाजे आतून बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आता ऍक्शन मोड मध्ये आले असून चिपळूण रेल्वे स्थानकावर विशेष जागरूकता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी गाड्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रवाशांशी संवाद साधला आणि सुरक्षित व कायदेशीर प्रवासाचे नियम समजावून सांगितले. मुकादम यांनी सांगितले की, अनेकदा अनधिकृत प्रवासी राखीव जागांवर बेकायदेशीरपणे कब्जा करतात, त्यामुळे आरक्षित प्रवाशांना जागा नाकारल्या जातात. अशा प्रकारांबाबत प्रवाशांनी गप्प न बसता तत्काळ स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) किंवा अधिकृत माध्यमांद्वारे तक्रार नोंदवावी.

प्रवाशांशी संवाद साधताना आरपीएफचे अधिकारी.

आरपीएफच्या या मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षा आणि नियमपालनाबाबत जागरूकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनानेही पुढील काळात दरवाजे आतून बंद ठेवणाऱ्यांवर कारवाईसह, प्रवाशांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत.