जालगांव वार्ताहर:- दापोली सेतु कार्यालय येथे मा.तहसीलदार दापोली यांच्या हस्ते नागरिकांना आँनलाईन डिजिटल ७/१२ व गांव नमुना ८ अ व फेरफार मिळणे कामी नुकतेच उद्याटन करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रात आता ऑनलाईन सातबारा, ऑनलाईन फेरफार दाखले उपलब्ध होणार आहेत. दापोली सेतू कार्यालयातून डिजिटल सातबारा दाखल्याचे वितरणास सुरुवात झाली. सेतू कार्यालयांमध्ये डिजिटल सातबारा दाखले उपलब्ध करू देणारा रत्नागिरी हा महाराष्ट्रातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.
सात-बारासह अन्य कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी महसूल विभागात ऐकायला मिळतात. सात-बारा की ओस्क ही यंत्रणा असली तरी नेटवर्क आणि अन्य काही मर्यादा त्या यंत्रणेला आहेत. अशावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सात बारासह जमिनीशी संबंधित महत्त्वाचे कागदपत्र तातडीने मिळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सर्व सेतू केंद्रांत सात-बारा, गावनुमना ८-अ आणि फेरफार देण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारी २०१८ मध्ये सातबारा दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी ‘एडिट मॉड्युल हे दुरुस्तीसाठीचे नवे सॉफ्टवेअर सर्व जिल्ह्यांना दिले. सातबारा उताऱ्यांवर अधिक खातेदारांची नावे असलेला सर्वाधिक सातबारा उतारे असलेला रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. शिवाय खातेही अधिक आहे.
दापोलीत २ लाख ३७ हजार ३७५ लाभार्थी
जिल्ह्यात एकूण २०,८४,०८३ सातबारा आहेत. त्यापैकी राजापूर तालुक्यात सर्वाधिक संख्या आहे. तर सर्वाधिक कमी मंडणगड तालुक्यात आहे. दापोली तालुक्यात २ लाख ३७ हजार ३७५ लाभार्थींना याचा लाभ घेऊ शकतात. या उताऱ्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर आता डिजिटल उतारे जिल्ह्यातील सर्व सेतूंमध्ये डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध होणार आहेत.केवळ रत्नागिरीतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन मिळू शकतात. याचा शुभारंभ दापोली येथील सेतू कार्यालयात करण्यात आला असून, त्याचे वितरणही सुरू झाले आहे. या नमुन्यासाठी फक्त २० दराने प्रत नागरीकांना मिळणार आहे.
दापोली सेतु कार्यालयात देखील डिजिटल स्वरूपात सातबारा, गाव नमुना ८ आणि ऑनलाईन फेरफार मिळणार असुन नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्याचा लाभ घ्यावा- मा. वैशाली पाटील (तहसीलदार, दापोली)
दापोली येथे झालेल्या उद्याटन प्रसंगी निवासी नायब तहसीलदार श्री. शिराळकर , अव्वल कारकून श्री. बापट , श्री. सनसोळे, तसेच तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी वर्ग श्री. हिंदोळे, श्री. झगडे, श्री. सूर्यवंशी श्री. पवार आणि सेतू कार्यालय दापोलीचे कर्मचारी श्री. सचिन चव्हाण, श्री. मिलिंद सिनकर, श्री. मनोज मोहिते, श्रीम. मृणाल चोरगे उपस्थित होते.