अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने अखेरीस १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या थरारक अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह, संघाचा माजी कर्णधार आणि पहिल्या हंगामापासूनचा आधारस्तंभ असलेला विराट कोहली अखेर आयपीएल चॅम्पियन बनला.
सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा कायम राहिली. पंजाब किंग्सला विजयासाठी शेवटच्या षटकात २९ धावांची गरज होती. शशांक सिंग मैदानावर टिकून होता, पण जॉश हेझलवूडने टाकलेल्या अखेरच्या षटकातील पहिले दोन चेंडू डॉट बॉल गेल्याने दडपण वाढले. शशांकने नंतर ३ षटकार आणि १ चौकार लगावला, परंतु तोपर्यंत सामना हाताबाहेर गेला होता. कृणाल पंड्या, यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने १९० धावांचा स्कोअर यशस्वीपणे डिफेंड केला आणि ६ धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ९ गडी गमावून १९० धावा केल्या. फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही, पॉवरप्लेमध्येच फिल सॉल्टची विकेट गमावली. पॉवरप्लेमध्ये १ बाद ५५ धावा झाल्या. विराट कोहलीने ३५ चेंडूत ३ चौकारांसह ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मयंक अग्रवालने २४ धावा, रजत पाटीदारने २६ धावा, लिव्हिंगस्टोनने २५ धावा आणि जितेश शर्माने १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावांची झटपट खेळी केली.
विराट कोहलीच्या १८ क्रमांकाच्या जर्सीशी आणि आयपीएलच्या १८व्या हंगामाशी मिळणारा योगायोग भावनिक ठरला. सामना संपल्यानंतर विराट कोहली मैदानावरच अश्रू अनावर झाल्याने चाहत्यांनाही भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने हा ऐतिहासिक विजय साकारला आणि चाहत्यांचे स्वप्न पूर्ण केले.
हा विजय आरसीबीच्या चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. १७ वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिलेल्या संघाने अखेरीस ट्रॉफी उंचावली. विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि नव्या कर्णधार रजत पाटीदारच्या मार्गदर्शनाखाली संघाने हा विजय साजरा केला.