रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 750 ग्रॅमच्या अकाली बालकाला नवसंजीवनी

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील विशेष नवजात शिशु काळजी कक्षात (SNCU) प्रथमच ७५० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बालकाला यशस्वी उपचार करून नवजीवन देण्यात आले.

दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजता श्रीमती लीना सुतार (वय ३३, रा. पाली, ता. जि. रत्नागिरी) यांच्या पुरुष जातीच्या अर्भकाचा जन्म याच रुग्णालयात झाला.

२७ आठवड्यांत जन्मलेल्या या बालकाचे वजन केवळ ७५० ग्रॅम होते, आणि त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली SNCU विभागातील बालरोग तज्ञ डॉ. शायान पावसकर (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. आदित्य वडगावकर (वरिष्ठ निवासी डॉक्टर), अधिसेविका जयश्री शिरधनकर, बालरोग परिचारिका श्रुती जाधव, कक्ष पर्यवेक्षिका सुवर्णा कदम आणि अधिपरिचारिका यांच्या अथक प्रयत्नांमुळे बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

श्वसनाचा त्रास असल्याने बालकाला व्हेंटिलेटरद्वारे कृत्रिम श्वास देण्यात आला. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (RDS) वर उपचारासाठी श्वसन नलिकेद्वारे सर्फॅक्टंट देण्यात आले.

बालकाच्या डोळ्यांची रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी (ROP) तपासणी आणि उपचार खासगी रुग्णालयात मोफत करण्यात आले.

मेंदूच्या सोनोग्राफीद्वारे हायड्रोसेफलसचे निदान झाल्यावर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात प्रथमच सिरियल लंबर टॅपिंगद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले.

६० दिवसांनंतर, दिनांक १४ मे २०२५ रोजी बालकाला डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी सोडण्यात आले. डिस्चार्जवेळी बालकाचे वजन १६९० ग्रॅम होते.

बालकाच्या नातेवाइकांना नियोजित तपासणीच्या तारखांसाठी सूचना देण्यात आल्या असून, त्यांना तपासणी फाइल आणि आशा स्वयंसेविकांसाठी पाठपुरावा कार्ड प्रदान करण्यात आले आहे. बालकाच्या नातेवाइकांनी सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*