रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेने गाठला ५०६६ कोटींचा व्यवसाय


रत्नागिरी जिल्हा बँकेची सामाजिक बांधिलकी: ५५.८५ लाखांची मदत

रत्नागिरी, दि. १८ एप्रिल २०२५: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सरत्या आर्थिक वर्षात ९४.६४ कोटी रुपयांचा ऐतिहासिक ढोबळ नफा कमावला आहे. बँकेच्या ठेवी २८६६.८७ कोटी रुपये, कर्जव्यवहार २१९९.६३ कोटी रुपये असा एकूण ५०६६.५१ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज बँकेच्या प्रधान कार्यालयातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉ. चोरगे यांनी सांगितले की, गतवर्षीच्या तुलनेत बँकेच्या ठेवींमध्ये २३०.७० कोटी रुपये, कर्जव्यवहारात १९५.३४ कोटी रुपये आणि एकूण व्यवसायात ४२६.०४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ढोबळ नफ्यात २६.११ कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली. बँकेचा ढोबळ एनपीए २.९१ टक्के असून, नक्त एनपीए सलग १३ वर्षे ०.०० टक्के आहे. सलग १४ वर्षे बँकेने ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त केला आहे.

Advertisement

रत्नागिरी जिल्ह्यात ९ तालुक्यांमध्ये ७६ शाखा आणि प्रधान कार्यालयासह बँकेचे जाळे विस्तारले आहे. २८ शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत असून, बहुतांश शाखा ग्रामीण भागात सेवा देत आहेत. सामाजिक बांधिलकीअंतर्गत बँकेने आपत्तीग्रस्त, खेळाडू, अनाथ आश्रम, दिव्यांग वसतिगृह, शेतकरी कार्यशाळा आदींसाठी ५५.८५ लाख रुपयांची मदत केली. तसेच, प्राथमिक शेती सहकारी संस्थांना कार्यालय इमारत बांधकामासाठी ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

शिक्षण क्षेत्रात योगदान म्हणून बँकेने जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांना १०० संगणक संच देण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी ५० संगणक संच २०२३-२४ मध्ये आणि उर्वरित ५० संगणक संच २०२४-२५ च्या सुरुवातीला सुपूर्द करण्यात आले. बँकेने ग्राहकांसाठी १९ ठिकाणी एटीएम सेंटर्स कार्यान्वित केली असून, पैसे काढणे, बॅलन्स तपासणे, मिनी स्टेटमेंट आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या प्राथमिक शेती सहकारी संस्थांना आणि थेट कर्जदारांना व्याजात ०.५० टक्के सवलत देण्यात आली. बँकेला लोकसत्ता संघर्ष सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थविश्व पुरस्कार आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचा बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ दि इयर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, ज्येष्ठ संचालक ॲड. दीपक पटवर्धन, रमेश कीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, राजेंद्र सुर्वे, म. शं. टिळेकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*