दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण जागृती कार्यानुभव उपक्रमांतर्गत कुंभवे गावात रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धेचे आयोजन केले.
आजच्या फास्ट-फूडच्या युगात रानभाज्यांचे औषधी महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रदर्शनात ५० हून अधिक रानभाज्यांचा समावेश होता, तर पाककृती स्पर्धेत २९ वेगवेगळ्या पाककृतींनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. सी. गजभिये, डॉ. एम. एम. कुलकर्णी, कुंभवे गावचे सरपंच लक्ष्मण झाडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पाककृती स्पर्धेत रूपाली तांबे यांनी प्रथम, मनिषा शिगवण यांनी द्वितीय आणि शमिका जोग यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.