माथेरानला फिरायला गेलेल्या राजापूरातील दांम्पत्याचा मृत्यू

रत्नागिरी : राजापूरहून माथेरानला फिरायला आलेल्या दाम्पत्याचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. माथेरानमधील दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पार्थ काशीनाथ भोगटे (४६) आणि लक्ष्मी पार्थ भोगटे (४६) अशी दोघांची नावं आहेत. राजापूर शहरातील प्रसिध्द फॅशन हाऊस या कापड दुकानाचे मालक काशिनाथ भोगटे यांचे पार्थ हे जेष्ठ पुत्र असल्याचे समजते. पार्थ व लक्ष्मी यांच्या या दुदैवी मृत्युने त्यांच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

राजापूरचे रहिवासी असलेले पार्थ व श्रीलक्ष्मी हे दोघे ११ जुलैला माथेरानला फिरण्यासाठी आले होते. संध्याकाळच्या सुमारास हे जोडपं फिरण्यासाठी बाहेर पडलं. त्यांचा मुक्काम तेथील हॉटेल ब्राईट लँडमध्ये होता. फिरण्यासाठी गेलेलं जोडपं परतलं नसल्याचं दुसऱ्या दिवशी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी याची माहिती हॉटेलच्या व्यवस्थापकाला दिली. व्यवस्थापकांनी पोलिसांना याबद्दल कळवलं. पोलिसांनी या दाम्पत्याचे फोटो व्हॉट्स ऍपच्या अनेक ग्रुप्सवर पाठवले. दाम्पत्यांबाबत काही माहिती समजल्यास, ते कुठे दिसल्यास कळवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं.

पोलीसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता हे दोघे इको पॉईंटला जाताना दिसलं. त्यांचं शेवटचं लोकेशन दरीजवळ असल्याचं तपासातून स्पष्ट झालं. यानंतर सह्याद्री रेक्स्यू टीमची मदत घेण्यात आली. त्यांनी दरीत शोध सुरु केला. याबाबत माथेरान पोलीसांकडून पार्थ यांच्या राजापुरातील कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर १४ जुलैला पार्थ यांचे लहान भाऊ रुद्राक्ष भोगटे माथेरानला पोहोचले. त्यांनी माथेरान पोलीस ठाणं गाठलं आणि भाऊ, वहिनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

रेस्क्यू टीमला सोमवारी १५ जुलै रोजी लुईसा पॉईंटजवळ दरीत या दोघांचे मृतदेह सापडले. या घटनेची माहिती देण्यासाठी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली व दरीत त्या दोघांचे मृतदेह आढळून आल्याचे व सह्याद्री रेस्क्यु टिमच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

या प्रकरणात अद्याप तरी शवविच्छेदन अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे जोडप्यानं आत्महत्या केली कि अपघात झाला याबाबत तपास सुरू असल्याचे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेंनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*