राहुल गांधींची पत्रकार परिषद हा Toolkitचाच भाग; जावडेकरांचा गंभीर आरोप

राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचं आणि टीकेचं खंडन केलं आहे.

जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत करोनाचा सामना करत आहेत, तेव्हा सरकारला नौटंकी वगैरे शब्द वापरुन देशाच्या जनतेचा अपमान केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. ते म्हणतात, आम्हाला नौटंकीसारखे शब्द वापरायचे नाहीत. पण त्यांची नौटंकी जनतेनं कधीच बंद केली आहे.

ते पुढे म्हणतात, “त्यांचा मुख्य मुद्दा होता की लसीकरण हा एकच उपाय आहे. आम्हीही कित्येक दिवसांपासून तेच म्हणत आहोत. देशाने लसींची निर्मिती केली. कोवॅक्सिन या संपूर्ण भारतीय बनावटीच्या लसीची निर्मिती केली तेव्हा काँग्रेसवाले त्यावर शंका उपस्थित करत होते. लस घेऊ नका सांगत होते. लसींबद्दल संशय, भ्रम तयार करत होते. ही काँग्रेसची रणनीती आहे. पण पंतप्रधान मोदींनी लस घेतल्यावर हे कोवॅक्सिनवर निर्माण झालेले प्रश्न बंद झाले. तेव्हा राहुलजी, लसीला विरोध तुम्ही केला आहे.

लसींच्या बाबतीत ते म्हणतात, “देशात तयार झालेल्या आणि परदेशातून येणाऱ्या आलेल्या लसींच्या माध्यमातून या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत सगळ्या देशाचं लसीकरण पूर्ण झालेलं असणार आहे. राहुल ज्या देशांचा उल्लेख करत आहेत, त्या देशांमध्येही नंबर लावल्यानंतर बऱ्याच दिवसांनी नंबर येत आहे. भारत आज लसीकरणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने २० कोटी नागरिकांचं लसीकरण केलं आहे. हे लसीकरणामागचं सत्य आहे. ऑगस्टपासून लसीकरणाचा वेग आणखी वाढणार आहे.”

“तुम्हाला जर लसीकरणाची एवढीच काळजी आहे तर जरा काँग्रेसशासित राज्यांकडे लक्ष द्या. तिथे लसीकरणाचा गोंधळ सुरु आहे. त्यांना दिलेल्या लसींचा तर ते लाभ घेत नाहीत. आजपर्यंत दिलेल्या २० कोटी लसी या केंद्र सरकारने दिलेल्या आहेत तेही अगदी मोफत! तेव्हा लसीकरण वेगात सुरु आहे. डिसेंबरपर्यंत २१८ कोटी लसींच्या मात्रा प्राप्त होणार आहेत. ज्यामुळे १०८ कोटी नागरिकांचं लसीकऱण पूर्ण होणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*