पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोचे उद्घाटन केलं आहे. ‘मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन माझ्या हस्ते झाले होते आणि आता उद्घाटनही माझ्या हस्ते झाले. मात्र यापूर्वी भूमीपूजन झाल्यानंतर प्रकल्प पूर्ण कधी होणार हे कळत नव्हते,’ असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मास ट्रान्सपोर्ट ही काळाची गरज आहे. त्यामुळे सरकारचा मेट्रो प्रकल्पांवर भर आहे. महाराष्ट्रातही मेट्रो प्रकल्पांची निर्मिती व विस्तार होत आहे. आपण कितीही मोठे असलो तरी प्रत्येकाने मेट्रोतून प्रवासाची सवय लावून घ्यावी.जितका प्रवास मेट्रोने कराल तितकीच शहराला मदत होईल,’ असं आवाहन यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसंच ग्रीन ट्रान्सपोर्ट, स्मार्ट मोबिलिटीवर आमचा भर आहे. रेरा कायद्यामुळे नागरिकांना सुरक्षित व्यवहाराची खात्री झाली, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पासंबंधित कामासाठी दिल्लीत येत होते. या प्रकल्पासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून मी त्यांचं अभिनंदन करतो. करोना महामारीच्या काळात मेट्रो सेवा सुरू झाली आहे,’ असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

पुणे शहरातील मुळा, मुठा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ होत आहे, अशी माहिती यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिली. तसंच पुणेकरांनी दरवर्षी नदी उत्सव साजरा करावा, त्यामुळे लोकांना नदीचे महत्त्व कळेल, असंही ते म्हणाले.