पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्यांच्या आरोपांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘पुण्याच्या कोविड सेंटरमध्ये पारदर्शक पद्धतीने काम व्हावीत अशापद्धतीने कटाक्षाने प्रयत्न केला आहे. कोविड सेंटरच्या कामाशी कोणत्याही राजकीय व्यक्तीचा संबंध नाही. यामध्ये सौरव रावसह काही अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांना जे काही करायचं आहे, ते अतिशय पारदर्शक पद्धतीने, चुकीच घटना काम नये, असे सांगण्यात आले होते,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.
तसेच पुढे अजित पवार म्हणाले की, ‘कोविड सेंटरबाबत आरोप होत असल्यामुळे आयुक्तांना याबाबत नोट काढण्यास सांगितली होती. आज बैठकीच्या सुरुवातीला यावर चर्चा करण्यात आली. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही.’
दरम्यान पुण्यातील कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार घेऊन ५ फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या पुणे महापालिकेत गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी धक्काबुकी केल्यामुळे ते पायऱ्यांवरून कोसळले आणि जखमी झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ९ जणांना अटक करण्यात आली होती. काल, शुक्रवारी किरीट सोमय्या यांचे पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आले. ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी महापालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
किरीट सोमय्यांच्या सत्कारानंतर काँग्रेसकडून मनपाच्या पायर्यांवर गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्यात आले. महापालिकेच्या पायर्यांवर किरीट सोमय्यांचा सत्कार करणे हे भाजपला योग्य वाटत असेल, तर ही पायरी आम्ही गोमूत्र आणि गुलाब पाण्याने धुवून शुद्ध केली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दिली.