राज्यात कोरोनाचासंसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लवकरच लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा. गुढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.