मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली चा शैक्षणिक वर्षाचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात दापोली शहरातील रसिक रंजन हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कडवई येथील करिअर मार्गदर्शक मिलिंद कडवईकर तर अध्यक्ष म्हणून एमइएस पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य शहाबाज देशमुख सह मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमा प्रसंगी दापोलीतील अजिज मुल्ला हायस्कूलने मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल व मौलाना आझाद ट्रस्ट औरंगाबाद च्या समितीमध्ये ट्रस्टी म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष इकबाल परकार यांचा सन्मान मुख्याध्यापक अय्युब मुल्ला व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला .
याप्रसंगी इकबाल परकार म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची रुजवणूक करणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे त्यांनी ते पार पाडणे गरजेचे आहे .सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे यांच्या हस्ते प्रशालेच्या नूतन वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना आलेल्या प्रमुख पाहुणे,संस्थेचे पदाधिकारी व शालेय समित्यांमधील कार्यरत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या शैक्षणिक वर्षातील हायस्कूलचा आदर्श विद्यार्थी म्हणून सालीम खान तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून फातिमा नदाफ व ज्यु.कॉलेजमधील आदर्श विद्यार्थी म्हणून इस्माईल पेटकर तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून समरीन कडवेकर या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रशालेचे माजी शिक्षक बदीउज्जमा खावर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी खावर ट्रॉफी इयत्ता नववीची विद्यार्थिनी जिया जमादार हीस देण्यात आली. प्रथमच प्रशालेतर्फे सुरू करण्यात आलेला आदर्श वर्ग शिक्षक पुरस्कार कॉलेजचे जमीर जमादार व हायस्कूलचे मुजावर सादिक यांना देण्यात आला.
या कार्यक्रमास मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिराज रखांगे, गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार,सचिव इकबाल परकार,कॉलेज कमिटी अध्यक्ष आरिफ मेमन,रफिक मेमन, अराई इन्फोटेक कंपनीचे वलीद आराई,शाळा व्यवस्थापन समिती,सखी सावित्री समिती आदी समित्यांचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान मोमीन, नाझमिन म्हैशाले यांनी तर आभार आफरीन दफेदार यांनी मानले.