मथुरा –मथुरेत पक्षाच्या प्रचारासाठी रोड शो करताना एका मोठ्या दुर्घटनेतून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी या काल थोडक्यात बचावल्या. त्यांचा रोड शो सुरू असताना विजेची तुटलेली तार प्रियंका गांधी यांच्या चेहऱ्यावरच कोसळण्याच्या बेतात होती. तथापि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने ही तार दूर करून त्यांच्यावरील मोठी आफत टाळली.
मथुरेतील छत्ता बजार भागात हा प्रकार घडला. तेथे प्रियंका गांधी यांचा काफिला पोहोचला त्याच्या आधीपासूनच तेथे एक विजेची तार लटकत राहिली होती. पोलिसांच्या गाड्या या मार्गावरून पुढे गेल्या. पण ही तार कोणी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रियंका तेथून जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरच ही लटकलेली विजेची तार चिकटण्याचा धोका निर्माण झाला होता. पण अगदी थोडक्यात ती दुर्घटना टळली.