‘यास’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या(शुक्रवार) ओडिसा व पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असणार आहेत. मोदी सर्वप्रथम भुवनेश्वर येथे आढावा बैठक घेतील. त्यानंतर बालासोर, भद्रक आणि पूर्व मिदनापूर या भागाची हवाई पाहणी करतील व त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आढावा बैठक घेतील. एएनआयाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘यास’ चक्रीवादळ बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले असून, ओडिशासह पश्चिम बंगालमधील काही भागाला या चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला. दरम्यान, चक्रीवादळामुळे पोषक स्थिती निर्माण झालेले नैर्ऋत्य मोसमी वारे आता अरबी समुद्रात सक्रिय झाले असून, त्यांनी निम्मा श्रीलंकाही व्यापला आहे. पुढील ४८ तासांत त्यांची आणखी प्रगती होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
‘यास’चा ओडिशाच्या किनारपट्टीला तडाखा
या वादळादरम्यान १४५ प्रति तास वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे शेकडो घरांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून, शेतात पाणी साचल्याने पिकांचे देखील नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंडला सर्वाधिक बसला आहे. तिन्ही राज्यांमधील लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
कोलकात्यातील सर्व उड्डाणपूल बंद
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले, की वादळाने त्यांच्या राज्यातील बऱ्याच भागाला तडाखा बसला असून पूर्व मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, पश्चिम मेदिनीपूर, हावडा, हुगळी, पुरुलिया, नैदा येथील लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण रात्र सचिवालयात बसून बॅनर्जी यांनी परिस्थितीवर देखरेख केली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोलाकात्यातील सर्व उड्डाणपूल बंद करण्यात आले आहेत.
तौक्ते चक्रीवादळानंतर एका आठवड्यात देशाच्या किनाऱ्यावर धडकणारं हे दुसरं चक्रीवादळ होतं. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी गुजराचा दौरा करत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत, मदत जाहीर केली होती.