रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि जिल्हा सहकारी बोर्डाच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर लवकरच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजु यांनी नुकतीच मुंबई येथे दरेकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या, या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेनुसार ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हेमंत वणजु यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे जिल्ह्यातील सहकार बोर्डासमोर असलेल्या अडचणी आणि समस्यांचा पाढा वाचवला, यावर दरेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, जिल्हा बोर्डांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने एक नवीन धोरण अंमलात आणले जाईल, या धोरणामुळे सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळण्यास मदत होईल.

आगामी ६ ऑक्टोबरच्या बैठकीत आर्थिक पाठबळ, शिक्षण-प्रशिक्षण, सहकार भवन, कर्मचारी आणि सुविधा यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार असून, जिल्हा सहकारी बोर्डांना अधिक सक्षम करण्यासाठी आर्थिक पाठबळ कसे देता येईल यावर विचार केला जाईल, सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाबाबत भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा करून नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यावर निर्णय घेण्यात येईल, रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र सहकार भवन उभारण्यासाठी शासकीय जमीन मिळवण्याच्या प्रयत्नांवर विचारविनिमय केला जाईल, सहकारी शिक्षण-प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे कर्मचारी आणि इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाईल.

या बैठकीमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील सहकार चळवळीला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता असून, आमदार प्रवीण दरेकर यांचा हा दौरा स्थानिक सहकार क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.