पॉवर हिटर्स गर्ल्स संघाने पटकावले महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांच्या इनडोअर टर्फ विकेट टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धेत पॉवर हिटर्स गर्ल्स संघाने विजेतेपद पटकावले आहे.

आर्टिफिशिअल टर्फ मैदान, कृषी उत्पन्न बाजार समिती, शांतीनगर, रत्नागिरी येथे झालेल्या या स्पर्धेत पी जी एस खंडाळा संघाने उपविजेतेपद मिळवले.

राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव बिपिन बंदरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी, उपाध्यक्ष दीपक देसाई, बलराम कोतवडेकर, दीपक पवार, सुनील घोसाळकर, अमित लांजेकर, प्रतिक सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विजेता पॉवर हिटर्स गर्ल्स संघाला 15,000 रुपये रोख आणि चषक, तर उपविजेता पी.एस.डी. खंडाळा संघाला 10,000 रुपये रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

तिसरा क्रमांक जी जे सी 95 गोल्डन फॅमिली गर्ल्स ग्रुप आणि चौथा क्रमांक हिरकणी संघाने मिळवला. त्यांना प्रत्येकी चषक देण्यात आला.

स्पर्धेतील मालिकावीर पी.एस.डी. खंडाळा संघातील मनाली निमरे हिला 2,000 रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आले.

तर उत्कृष्ट फलंदाज पी.एस.डी. खंडाळा संघातील सानिया महाकाळ, उत्कृष्ट गोलंदाज पी.एस.डी. खंडाळा संघातील मनाली निमरे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हिरकणी संघातील नंदिता सावंत आणि उगवता तारा जी जे सी 95 गोल्डन फॅमिली गर्ल्स ग्रुप संघातील कीर्ती सौरव यांना प्रत्येकी 1,000 रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

अंतिम सामन्यातील सामनावीर पॉवर हिटर्स गर्ल्स संघाची मनीषा शितप हिला 1,000 रुपये रोख आणि चषक देण्यात आला.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महिलांच्या 12 संघांनी सहभाग घेतला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*