आज 1 जानेवारीपासून पर्ससीन मासेमारीचा बंदीचा काळ सुरु होत आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या क्षेत्रात 1 जानेवारीपासून पर्ससीन मासेमारी नौकेने मासेमारी केल्यास अशा नौका कारवाईच्या जाळ्यात अडकणार आहेत.नव्या कायद्यानुसार दंड दुप्पट करण्यात आल्यामुळे मच्छिमारांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

बंदीच्या काळात मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौका पहिल्यांदा सापडल्यास 1 लाख रुपयांचा दंड आणि नौकेवर सापडलेल्या मासळीच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे. तीच नौका दुसऱ्यांदा बंदीचे उल्लंघन करून मासेमारी करताना आढळल्यास तीन लाख रुपये दंड आणि नौकेवर सापडलेल्या मासळीच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे. या कारवाईनंतरही ती नौका तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करताना सापडली तर त्या नौकेला 5 लाख रुपये दंड आणि नौकेवर सापडलेल्या मासळीच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे आणि ती नौका जप्त करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी दिली.