विनावीज अंगणवाड्या सौर ऊर्जेवर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
रत्नागिरी : राज्यभरात सुमारे 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप करण्यात येत आहे. राज्यातील साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी विशेष बाब म्हणून 12 वी मधून सूट देण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देतानाच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी, ज्या अंगणवाड्यांमध्ये वीज नाही, अशा पहिल्या वर्षी 36 हजार अंगणवाड्या सौर ऊर्जेवर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
खेड येथील कै. द. ग. तटकरे सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला मेळावा घेऊन अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले.
यावेळी बाबाजी जाधव, माजी जि. प. सदस्य अजय बिरवटकर, तहसीलदार सुधीर सोनवणे, गटविकास अधिकारी यशवंत भांड आदी उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, रोजच्या कामाची जबाबदारी पार पाडताना अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकरवरुन अपलोडींगची कामे करावी लागत असत. हक्काचा मोबाईल मिळावा अशी मागणी होती.
केवळ मोबाईल न देता, चार्जर, कव्हर, पाऊच, सीम असे कीट देण्यात येत आहे. त्याचा मनस्वी आनंद होत आहे. माता गरोदर असल्यापासून ते बाळ सहा वर्षांचे होईपर्यंत अंगणवाडी सेविका तिची जबाबदारी घेत असते.
इतरांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या मूळ कुटुंबांची देखील काळजी मोफत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून आमचा विभाग घेईल.
तेरा हजार मिनी अंगणवाडींचे रुपांतर अंगणवाडीमध्ये केले असून 17 हजार मदतनीसांची भरती केली. लवकरच आणखी 13 हजार भरती करण्यात येणार आहे.
लेक लाडकी अंतर्गत वर्षात अडीच लाख कुटुंबाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अधिकाधिक प्रस्ताव अपलोड करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे यांनी स्वागत प्रास्ताविक करुन सविस्तर माहिती दिली. यावेळी लेक लाडकी योजना, एलआयसी एक रक्कम पेन्शन योजना, बाल संगोपन योजना, बेबी केअर कीट, स्मार्ट कीट, पूर्व शालेय शिक्षण कीट लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी तृणधान्य, कडधान्य याचा खुबीने वापर करत लेक लाडकी अभियान पोषण पंधरवडा, पोषण आहाराचे महत्व यावर कलात्मक, आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या.