दीपाली मोहिते यांनीही केला राष्ट्रवादीत प्रवेश
दापोली/ प्रतिनिधी
दापोली नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा परविन शेख यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि रायगड मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगडमध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश पार पडला. नगराध्यक्षा परवीन शेख देखील यावेळी उपस्थित होत्या. केवळ तांत्रिकबाबींमुळे त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेश लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे.
येऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, नगरसेवक व उपजिल्हाध्यक्ष खालीद रखांगे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीनं शिवसेनेला दिलेला हा मोठा धक्का समजला जात आहे.
पाच वर्षांपूर्वी परवीन शेख यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत परवीन शेख यांनी संचिता जोशी यांचा 11 मतांनी पराभव केला होता. आपल्या पहिल्या वहिल्या निवडणुकीतच त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळाली.
परवीन शेख निवडणूक लढण्यापूर्वी सामाजिक कार्य करत होत्या. 2016 साली त्यांनी सक्रीय राजकारणात यायचं ठरवलं. नगरपंचायत निवडणुकीसाठी मनसेनं त्यांना उमेदवारी जाहीर सुद्धा केली होती. पण नंतर त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता हा इतिहास आहे.
त्याच निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट मागितल्याची देखील चर्चा होती. तेव्हा त्यांना राष्ट्रवादीचं तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेनेचं तिकीट स्विकारलं होतं. आता बरोबर पाच वर्षांनी त्यांची नगराध्यक्षपदाची मुदत संपण्याच्या आधीच त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्या देखील लवकरच अधिकृतरीत्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत अशी सूत्रांची माहिती दिली आहे.
दीपाली मोहिते राष्ट्रवादीत!
दापोली काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊ मोहिते यांची मुलगी व युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अविनाश मोहिते श यांची बहिण दीपाली मोहिते यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ज्यांच्याकडे काँग्रेसची महत्वाची पदं आहेत, अशा व्यक्तीच्या घरातील व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं आहे.
पण या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसनं राजकीय बाजी मारलीय हे नक्की.