दापोली : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दापोली येथे दि.13 ते 17 मे या कालावधीत सुवर्ण पालवी 2022 या भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या महोत्सवाच्या आयोजना संबंधीची घोषणा मुंबई येथे केली. तसेच या महोत्सवाच्या माहितीपत्रकाचे त्यांच्या हस्ते विमोचनाही करण्यात आले.

माहितीपत्रकाचं विमोचन करताना कृषीमंत्री दादा भुसे

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. प्रमोद सावंत, सहयोगी अधिष्ठाता (वनशास्त्र) डॉ. अजय राणे, प्राध्यापक डॉ. मंदार खानविलकर, डॉ. सखाराम देसाई, डॉ शरद पाटील यांनी मुंबई येथे मा. कृषी मंत्री महोदयांची भेट घेतली.

या भेटीत डॉ. प्रमोद सावंत यांनी या महोत्सवाची रूपरेषा मंत्र्यांसमोर सादर केली. त्यानंतर कुलगुरू डॉ.संजय सावंत आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी मंत्री महोदयांना या महोत्सवाच्या आयोजनाबाबतची सविस्तर माहिती दिली.

पालवी महोत्सवाची माहिती देताना कुलगुरू डॉ. संजय सावंत

याप्रसंगी सुवर्ण पालवी 2022 कृषी महोत्सवाचे कार्यक्रम व्यवस्थापक संदीप गिड्डेही उपस्थित होते.

या कृषी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, प्रात्यक्षिके, परिसवांद, चर्चासत्रे, शिवार फेरी, प्रशिक्षण, विविध स्पर्धा, शेतकरी मेळावा, महिला शेतकरी मेळावा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दादा भुसे यांनी या महोत्सवाच्या आयोजनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि या उपक्रमासाठी शुभेच्छाही दिल्यात.