रुग्णवाढीबरोबर मृत्यूचं तांडव! २४ तासांत १,७६१ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली – देशात करोना बाधितां बरोबरच मृतांची संख्याही वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीबरोबर मृत्यूचा आकडा वाढत असून, ताज्या आकडेवारीमध्ये त्यात अधिक भर पडली आहे. गेल्या २४ तासांत करोना रुग्णवाढ कमी झाली असली, तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या कमालीची वाढली आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात दीड हजारांहून अधिक करोनाबळीची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिवसभरात आढळून आलेल्या बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५९ हजार १७० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. तर दुसरीकडे १ लाख ५४ हजार ७६१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दररोजच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत असलं, तरी काळजीची बाब म्हणजे देशात दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ हजार ७६१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून प्रचंड वेगाने वाढ होत असल्याने दुप्पट रुग्णवाढीचा कालावधीही झपाट्याने कमी झाला आहे. देशात रविवारी २ लाख ७३ हजार ८१० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यात सोमवारी घट झाली आहे. मात्र, मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. रविवारी १,६१९ जणांचा मृत्यू झाला होता. १ हजार ७६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकाच दिवसात मृत्यूचा आकडा शंभरपेक्षा अधिक वाढला आहे.

भारतात झालेल्या करोना उद्रेकामुळे इतर देश सावध झाले आहेत. हॉगकाँगने भारतीय विमानांना प्रवेश बंद केला आहे. तर अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने अमेरिकनं नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. भारतात रुग्णसंख्या वाढल्यामुळे नागरिकांनी भारताचा दौरा करणं टाळावं. पूर्णपणे लसीकरण झालेलं असलं तरीही संसर्ग होण्याचा व विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतात जाणं टाळावं. जर जाणं अत्यावश्यक असेल, तर आधी पूर्णपणे लसीकरण करून घ्यावं,” असं रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं म्हटलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*