14 नगरसेवक आज स्थापणार स्वतंत्र गट

दापोली नगरपंचायतीच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. “ऑपरेशन टायगर” नावाच्या राजकीय खेळीने इथे सत्तांतराचे वारे वाहू लागले आहेत. या घडामोडींचे केंद्रस्थान म्हणजे शिवसेना (शिंदे गट) आणि त्यांच्यातील नेते रामदास कदम यांची भूमिका.

राजकीय पार्श्वभूमी
दापोली नगरपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. विविध पक्षांतील नगरसेवकांमध्ये मतभेद वाढत चालले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) ने सक्रिय भूमिका घेतली. रामदास कदम यांनी पडद्यामागून सूत्रे हलवत नगरसेवकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.

“ऑपरेशन टायगर”ची सुरुवात
या राजकीय घडामोडींना “ऑपरेशन टायगर” हे नाव देण्यात आले. या ऑपरेशनची सुरुवात खालिद रखांगे यांच्या रामदास कदम यांच्या भेटीने झाली. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला.

नगराध्यक्षा ममता मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवक साधना बोत्रे, भाजपाच्या नगरसेवक जया साळवी यांच्या व्यतिरिक उर्वरित चौदा नगरसेवक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

या गटाच्या गटनेतेपदी शिवानी खानविलकर यांचं नाव निश्चित असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर मोहित आता जवळ जवळ फत्ते झाल्याचं बोललं जातं आहे.

दापोली नगर पंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड घडामोडी घडत होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 5 नगरसेवकांनी 18 फेब्रुवारी रोजी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे होता. तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन स्वतंत्र गट स्थापन केला होता.

आता पुन्हा एकदा 14 नगरसेवकांचा गट स्थापन होताना दिसत आहे. दापोली नगरपंचायतीचे 14 नगरसेवक रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. दुपारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर ते अधिकृतरित्या पक्ष प्रवेश कधी करतात याची सर्वांना उत्सुकता आहे.

खालिद रखांगे यांचं शिवसेना नेते रामदास कदम यांना भेटणं, इथूनच नव्या समीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर असं मानलं जात होतं की, दापोली नगर पंचायतीत सत्तांतर होणार.

आत ती वेळ अगदी जवळ आली आहे. नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा मार्ग मोकळा आहे आहे. आवश्यक संख्याबळ आता शिंदेंच्या शिवसेनेकडे उपलब्ध झालेलं आहे.

कोण होणार दापोलीच्या नव्या नगराध्यक्षा?

ममता मोरे यांच्या नंतर दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची चर्चा आता संपूर्ण दापोलीत सुरू झाली आहे.  दापोली न. पं. मध्ये नगराध्यक्षपदासाठी सध्या महिला आरक्षण आहे. त्यामुळे सगळ्यात प्रबळ दावेदार म्हणून कृपा घाग यांच्याकडे पाहिलं जात आहे.

नुकत्याच झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीमध्येही त्यांना सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याचं नाव नगराध्यक्षपदासाठी जवळ जवळ निश्चित मानलं जात आहे. परंतु या रेसमध्ये शिवानी खानविलकर यांच्याही नावाची दबक्या आवाजात चर्चा आहे. शिवाय नगरसेवक प्रति शिर्के यांचंही नाव घेतलं जात आहे. अर्थात शिवसेनेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे.

कोण होणार उपनगराध्यक्ष?

सध्या दापोली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी खालिद रखांगे विराजमान आहेत. नव्या समीकरणातही त्याचं हे पद अबाधित राहील अशी माहिती मिळत आहे. खालिद रखांगे यांच्या येण्यानं दापोली नगरपंचायतीची लढाई शिवसेनेनं पूर्णपणे जिंकली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये खालिद रखांगे यांनी आपल्या अंगी असलेला राजकीय मुसद्दीपणा दाखवत एकहाती सत्ता खेचून आणली होती. आता तेच शिवसेनेत येत असल्यानं शिवसेना नेत्यांचं सत्ता स्थापनेचं टेंशन दूर झालं आहे.

अविश्वास ठरवासाठी पुरेसं संख्याबळ!

दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी पुरेस संख्याबळ आता शिवसेनेकडे आहे. महिला नगराध्यक्षा असल्याने दोन तृतीयांश संख्याबळाची आवश्यकता होती. आता 14 नगरसेवक एकत्र आल्याने अविश्वास ठराव सहज मंजूर होऊ शकेल.

नगराध्यक्षा ममता मोरे काय निर्णय घेणार?

विद्यमान नगराध्यक्षा ममता मोरे आता या बदलत्या राजकारणामध्ये काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा राहणार आहेत. त्या स्वतःहून राजीनामा देणार की अविश्वास ठरवाला सामोऱ्या जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन दिवसांपूर्णी नगराध्यक्षा ममता मोरे या नॉट रिचेबल झाल्या होत्या. दापोलीमध्ये अशी चर्चा होती की त्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. परंतु तशी अधिकृत कोणतीही माहिती अजूनही समोर आलेली नाहीये.

खरं तर राजकारणामध्ये त्यांचं नशीब एकदमच चांगलं म्हणायला हवं. नगराध्यक्षपदावर त्यांची निवड अडीच वर्षांसाठी झाली होती.  त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण देखील केला. त्यांचा नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांच्या उपस्थित सेंड ऑफ देखील झाला. अनेकांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. त्यांचा मुलगा साई मोरे याने त्यांच्या वैयक्तिक गाडीवर माजी नगराध्यक्षा असं लिहिलं देखील. परंतू राजकारणात ज्यांचे स्टार चांगले असतात त्यांच्याबाबतीत काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय दापोलीकरांना आला.

शासनाचा नवा जीआर आला. यापुढे नगराध्यक्षांचा कालावधी पाच वर्षांचा राहणार. लगेच साईने गाडीवरील माजी शब्द खोडून काढला. नगराध्यक्षा ममता मोरे पुन्हा नगरपंचायतीत विराजमान झाल्या. त्यांचा कालावधी आता तीन वर्षांपेक्षा जास्त झाला आहे. यापुढे काय होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

शिवसैनिकांमध्ये आनंद

दापोली नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येणार असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं  वातावरण आहे. ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आला आहे.

नव्या गटातील नगरसेवक!

नव्या गटामध्ये खालिद रखांगे, कृपा घाग, अन्वर रखांगे, विलास शिगवण, महबूब तळघरकर, संतोष कलकुटके, रिया सावंत, अश्विनी लांजेकर, आरीफ मेमन, प्रीती शिर्के, रवींद्र शिरसागर, शिवानी खानविलकर, अजिम चिपळुणकर आणि नौशीन गिलगिले यांचा समावेश आहे.