कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयामध्ये वरिष्ठ लिपीक असलेल्या शिवदास देवजी आग्रे (वय.४७) यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. अज्ञाताने त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 1,14,003 काढून फसवणूक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवजी आग्रे यांना अज्ञात आरोपीने दि. 05 मे 2021 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास बी.एस.एन.एल ग्राहक सेवा केंद्रामधून मो. क्र. ८९२७८०३०२७ यावरुन फोन करुन, “तुमची के.वाय.सी पुर्ण नाही, तुमचा मो.क्र. ९४२०xxxxxx हा तात्काळ बंद करण्यात येईल, असे सांगितले. म्हणून देवजी आग्रे यांनी मोबाईल रिचार्ज करीता १०/- रु. आदायगी पहिल्यांदा गुगल पे वरुन केली. परंतु प्रक्रिया पूर्ण होत नाही, असे सांगून त्या अज्ञात आरोपीने आग्रे यांना प्ले स्टोअर वरुन एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.

त्याप्रमाणे आग्रे यांनी अॅप्लिकेशन डाऊनलोड केले आणि इथंच गडबड झाली. त्यानंतर लगेच आग्रे यांच्या आर.डी.डी.सी बँक खात्यामधून ९९,९९४/- रु. परस्पर काढून घेण्यात आले आहे. त्याचवेळी दापोली शाखेतील भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातूनही १४,००९/-रु. परस्पर काढून घेवून फिर्यादी यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली.

दापोली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.