खेड : अमली पदार्थ विरोधी कारवाई करताना खेड पोलिसांना खवटी येथे सापडलेल्या १ किलो ८०० ग्रॅम गांजा प्रकरणी कारवाई करताना आणखीन एक जण हाती लागला आहे. रविंद्र खळे (३८, रा.वालोपे, ता.चिपळूण) असे त्याचे नाव आहे.
त्याला न्यायालयाने ६ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील खवटी येथे पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात रविंद्र सहदेव जाधव (४५, रा सिद्धार्थनगर,भटवाडी, घाटकोपर, मुंबई) हा इकोसह सापडला होता. त्याच्या गाडीची तपासणी केली असता १ किलो ८०० ग्रॅम गांजा बरोबर ५ लाख ४४ हजार २१२ रुपयांचा ऐवज हस्तगत केला होता.
कारवाई दरम्यान महामार्गावर पल्सर दुचाकी घेऊन फरारी झालेल्या अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरु असताना चिपळूण तालुक्यातील वालोपे येथील रविंद्र खळे याचा समावेश असल्याचे दिसून येत होते.
त्याला पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकातील उपनिरीक्षक हर्षल हिंगे, शिपाई रुपेश जोगी, प्रकाश पवार, कृष्णा बांगर, राहुल कोरे, वैभव ओहोळ, अजय कडू यांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले आहे. यापुर्वी रविंद्र जाधव यास रविंद्र खळे हा गांजा पुरवठा करत होता, हे तपासात उघडकीस आले आहे.
रविंद्र जाधव याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता जाधव याला ४ नोव्हेंबर आणि खळे यास ६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
आता ‘वडी’चे पुरवठादार पोलिस रडारवर
चिपळूण पाठोपाठ खेड शहरी आणि ग्रामीण भागात अनेक तरुण गांजा च्या आहारी गेले आहेत.
शहरात हुक्का ओढण्यासाठी लागणारी ‘वडी’चा पुरवठा करणारे ही सक्रिय असून गांजाची विक्री भोस्ते, भरणे, खेड शहरासह खाडीपट्टा भागातही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
गांजा खरेदी विक्रीच्या समवेत आता हुक्का ओढण्यासाठी लागणाऱ्या ‘वडी’चा पुरवठादार पोलिस शोधत आहेत. तर, हुक्क्यासाठी लागणारी ‘वडी’चा व्यवसाय सध्या शोधण्यासाठी पोलिस प्रयत्न पोलिस करीत आहेत.
सविस्तर माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस नागरिकांना देत आहेत.