ओबीसी आरक्षण अन् भाजपचा एल्गार; फडणवीस,चंद्रकांत पाटीलसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आज भाजपाकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले जात आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान,देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतले.

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झाले. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं, असा आरोप त्यांनी केला. सरकारला येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्यात, असा आरोपही त्यांनी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. ओबीसींचे आरक्षण राज्य सरकारमुळे गेले. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आला आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. आंदोलनानंतर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ओबीसी आरक्षण हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, रद्द झालेले आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेलार आणि महाजन यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. सरकार ओबीसी आरक्षणविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले आहे. सरकारने फक्त 15 महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर केली. तसंच आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार देखील केला. त्या पुण्यात बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका. संघर्षाची भावना तुटू देऊ नका. ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. भविष्यातल्या संघर्षासाठी आम्ही तयार आहोत.”

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*