गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार एस. टी. बसेसच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. पण प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड – 19 ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणे अनिवार्य आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक) आल्यानंतरच संबंधितांना प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे.
कोकणात जाण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
ई पास नको, पण कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणा असा आदेश महामंडळाने काढला आहे. त्यामुळे कोविड-19 च्या टेस्टसाठी चाकरमान्यांना अडीच हजार मोजावे लागणार आहेत.
याशिवाय या काळात कोकणात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स व खाजगी गाड्यांनी येणाऱ्या चाकरमान्यांना देखील कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. टेस्टचा रिपोर्ट दाखविल्याशिवाय त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे. कोकणात येताना इथल्या स्थानिकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.