संभाजीराजे छत्रपती यांच्या तोंडी अनेक घोषणा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. तसेच त्यांनी भाजपच्या विरोधातही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, त्यामुळं त्यांच्याशी विरोध किंवा वाद नसल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जळगाव दौर्‍यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. याविषयी सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवले तर नक्कीच जाणार आणि पूर्ण सहकार्य राहणार. यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. मात्र, कोणी राजकारण करत असेल तर त्यास उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची भूमिका संभाजीराजे यांनी मांडली नसल्याचेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे जळगावमध्ये भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेशकर्ते झाल्याने फडणवीस यांनी मंगळवारी मुक्ताईनगरमध्ये जाऊन भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्ष बांधणीवर चर्चा केली. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड थांबणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फडणवीस येणार म्हणून खडसे यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी फडणवीस यांनी खडसेंच्या घरात बसून जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या बांधणीवर रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच जळगावमध्ये खासकरून रावेर मतदारसंघात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीवरही त्यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.

पडझड थांबणार?
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आल्यापासून जळगाव भाजपमध्ये मोठी पडझड सुरू झाली आहे. अनेक नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. ग्रामपंचायतीचा निकालही भाजपच्या विरोधी गेला आहे. खडसे गेल्यानंतर पक्षाची होणारी पडझड थांबवण्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयत्नही अपुरे पडताना दिसत आहे. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड रोखण्यासाठी फडणवीस यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. फडणवीस यांनी या भेटीत पक्षाच्या बांधणीवरच रक्षा खडसे आणि महाजन यांच्याशी चर्चा केल्याने फडणवीसांनी जळगाव जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे बोलले जात आहे.

शिवसैनिकांनी अडवला ताफा
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फडणवीस यांचा वाहनांचा ताफा अडवला. यावेळी मुक्ताईनगरच्या जिल्हा रुग्णालयाचे काहीच काम केले गेले नाही, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे अनेक वर्षे भाजपचे आमदार असतानाही कुठलीही विकासकामे न झाल्याचा आरोप केला.