नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा: “कुणालाही सोडणार नाही, नारायण राणेंच्या अटकेचा व्हिडिओ अजूनही सेव्ह”

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना थेट इशारा देताना म्हटले की, खासदार नारायण राणे यांच्या अटकेचा व्हिडिओ त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये अजूनही सेव्ह करून ठेवला आहे.

“ज्या दिवशी मी याची परतफेड करेन, त्याच दिवशी मी तो व्हिडिओ डिलीट करेन. मी कुणालाही सोडणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

गुरुवारी सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा झाला. या कार्यक्रमाला महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या काळात नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा उल्लेख केला.

ते म्हणाले, “साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्यात आली. तो क्षण मी माझ्या मोबाईलमध्ये जपून ठेवला आहे.

ज्या दिवशी मी याचा हिशोब चुकता करेन, तेव्हाच हा व्हिडिओ डिलीट करेन. राणे साहेबांना त्रास देणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब होईल. कोणीही सुटणार नाही.”

नितेश राणे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*