नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल, रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर कोल्हापूर येथे उपचार घेत असलेले आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेने पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. नितेश राणे यांना कणकवली तालुक्यात न्यायालयाने दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत प्रवेशबंदी असल्याने राणेंना ओरोसच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. नितेश राणे यांची तब्येत ठीक असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे हे कणकवली न्यायालयात शरण आले होते. यानंतर न्यायालयाने त्यांची दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यानच्या काळात नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नितेश राणे यांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ते आज कोल्हापूरहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आमदार नितेश राणे हे काय बोलतात त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार नितेश राणे यांना दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत न्यायालयाने कणकवलीत प्रवेश बंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर नितेश आणि नेमके कुठे राहतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत आठवड्यातून एकदा पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लावण्याचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*