दापोली- शासनाच्या निपुण भारत अभियानांतर्गत सध्या सर्वत्र ‘निपुणोत्सव’ साजरे होत आहेत. दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्रस्तरीय निपुणोत्सव नुकताच गिम्हवणे केंद्रशाळेत समारंभपूर्वक पार पडला.

यानिमित्त विविध उपक्रम व इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, प्रधानमंत्री पोषण शक्ति स्वयंपाकींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

गिम्हवणे केंद्रशाळेत पार पडलेल्या या निपुणोत्सवाचे उद्घाटन गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील कारखेले, गिम्हवणे गावचे उपसरपंच शैलेश खळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गिम्हवणे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मानसी दुबळे, उपाध्यक्ष अमोल येलवे, रत्नागिरी जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे, गिम्हवणे शाळेच्या मुख्याध्यापिका मुग्धा सरदेसाई, गिम्हवणे केंद्रातील इतर सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

निपुणोत्सवानिमित्त गिम्हवणे केंद्रातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध बौद्धिक व मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वच्छतेच्या सवयी व योगासनांचे महत्त्व, गणिती कोडी व खेळ, भाषापेटीचे सादरीकरण, प्रश्नमंजुषा, वाचनस्पर्धा, गणितज्ञांच्या गोष्टींचे कथाकथन, मी स्वच्छता मॉनिटर ( स्वानुभव कथन ), शिक्षक शैक्षणिक साहित्यनिर्मिती, शालेय स्वयंपाकींसाठी ‘माझी पोषण थाळी’ पाककृती स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व स्पर्धांतील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरीता हजारे व नानासाहेब लाड यांनी केले तर केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी सर्वांचे आभार मानले.