
दापोली : तालुक्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. टेटवली पंचायत समिती गणाचे धडाडीचे आणि अभ्यासू नवनिर्वाचित सदस्य निलेश अशोक शेठ यांची दापोली पंचायत समितीच्या शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी आणि मुख्य प्रतोद पदी (Chief Whip) नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण निवड करण्यात आली असून, निलेश शेठ यांच्याकडे आता पक्षाची मोठी धुरा सोपवण्यात आली आहे.
निलेश शेठ यांचा आजवरचा राजकीय प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. त्यांनी यापूर्वी वाकवली गावचे सरपंच म्हणून उत्तम कामगिरी बजावली असून, त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची दखल घेत त्यांची नियोजन आयोगाचे निमंत्रित सदस्य म्हणूनही निवड करण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी जनमानसात आपली पकड सिद्ध केली आहे. या निवडणुकीत त्यांनी संपूर्ण तालुक्यात सर्वाधिक मते मिळवण्याचा मान पटकावला असून, तब्बल ३४६० मतांची मोठी आघाडी घेत त्यांनी दणदणीत विजय संपादन केला होता.
त्यांच्या या अभ्यासू वृत्तीची आणि संघटनात्मक कार्याची पावती म्हणून आता त्यांच्या खांद्यावर गटनेतेपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निलेश शेठ यांच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये पक्षाची बाजू अधिक भक्कमपणे मांडली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply