रत्नागिरी : राज्याने दिलेल्या एसओपीनुसार महाराष्ट्रात सर्व गोष्टी सुरू असताना रत्नागिरीत असलेल्या कर्फ्यूकडे माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेवर फोडू नये. राज्याने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ज्या गोष्टी सुरू आहेत त्या रत्नागिरीमध्येही सुरू राहिल्या पाहिजेत,असे निलेश राणे यांनी सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने कोव्हीडचा प्रतिबंधसाठी नवीन अद्यादेश जाहीर करत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात चक्क कर्फ्यू लावला गेला असून राज्य सरकारच्याच आदेशाची पायमल्ली जिल्हा प्रशासन करताना दिसत आहे. या गोष्टीकडे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेच्या माथी मारू नये.
महाराष्ट्र राज्यात वेगळा नियम आणि फक्त रत्नागिरीसाठी वेगळा नियम असता काम नये. ते म्हणाले की मुंबई येथे रिक्षा, रेल्वे, हॉटेल्स सुरू आहेत. तशी अन्य जिल्ह्यातही आहेत. राज्याने दिलेल्या निर्देशानुसार ती सुरू आहेत. मग रत्नागिरीमध्ये असे काय झाले की त्याठिकाणी कर्फ्यू लावला जात आहे? असा सवाल करताना जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा आधी सक्षम करण्याकडे लक्ष देण्याची सूचना निलेश राणे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, कोरोनाची पेशंट काय आकाशातून पडत आहेत का? की रत्नागिरीला वेगळी नियम लावले जात आहेत. ज्या गोष्टी राज्यात सुरू आहेत त्या रत्नागिरीत बंद आहेत. रत्नागिरीला काय भिकेला लावायचे ठरवले आहेत काय? असा सवाल करतानाच त्यांनी ज्या गोष्टी महाराष्ट्रभर सुरू आहेत, त्या रत्नागिरीत सुरू झाल्या पाहिजेत असे स्पष्ट केले. लोकांचा अंत आता पाहू नका, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.