लोटे वारकरी गुरुकुलात नव्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी; भगवान कोकरे महाराज आणि सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप

खेड : तालुक्यातील लोटे येथील अध्यात्मिक वारकरी गुरुकुल पुन्हा एकदा गंभीर आरोपांच्या केंद्रस्थानी आले आहे. गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांच्यावर दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर खळबळ उडाली होती. आता आणखी एका अल्पवयीन मुलीने कोकरे महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

खेड पोलिसांनी भगवान कोकरे महाराज, गुरुकुलातील आध्यात्मिक शिक्षक प्रितेश कदम आणि पीडित मुलीच्या आत्या रोहिणी वामन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ ऑक्टोबर २०२४ ते १८ जून २०२५ या कालावधीत लोटे येथील गुरुकुलात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, धार्मिक शिक्षण आणि साधनेच्या नावाखाली कोकरे महाराजांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यात प्रितेश कदम आणि रोहिणी वामन यांचाही सहभाग असल्याचा तिचा दावा आहे.

या तक्रारीवरून खेड पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील (बी.एन.एस.) कलम ६४(२)(१), ६५, ३५१(३), ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीच्या तक्रारीनंतर कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांना न्यायालयात हजर करून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. नव्या तक्रारीमुळे त्यांच्यावरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

लोटे वारकरी गुरुकुलात अनाथ, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण आणि आध्यात्मिक संस्कार दिले जातात, असा दावा केला जात होता. मात्र, या आड लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असल्याचे उघड झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. सामाजिक संघटना आणि स्थानिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच गृहमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणाने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गुरुकुलाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली असून, लवकरच या प्रकरणातील सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*