देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीचे अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. UNSC च्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान होणार आहेत. गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान UNSC च्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत, असं संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितलं आहे. भारत आज रविवारी UNSC चा अध्यक्ष बनला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचा हा आठवा कार्यकाळ असून या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक संपूर्ण ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार आहे. भारताच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील एखाद्या राजकीय नेत्याने, पंतप्रधानांने अशा प्रकारचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणे ही पहिलीच गोष्ट आहे. संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार, सुरक्षा परिषदेतील स्थायी आणि अस्थायी सदस्य राष्ट्रांना क्रमाने अध्यक्षपद दिले जाते. भारत सध्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिदषेचा अस्थायी सदस्य देश असून या वेळचे अध्यक्षपद भारताच्या पारड्यात पडलं आहे. भारत २०२१ आणि २०२२ या वर्षांसाठी युक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अस्थाई सदस्य आहे. सोमवारी भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.