रत्नागिरी : मोदी सरकाराने गेल्या ७ वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशिर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा महत्त्वाची आहे. चिपळूण, रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून त्यांचा केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांची आणि पर्यटन विकासासाठी व्यावसायिकांची भेट नारायण राणे घेणार आहेत, अशी माहिती जन आशिर्वाद यात्रेचे कोकण प्रमुख प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोकणात रिफायनरी होणे आवश्यक आहे. कोयनेचे पाणी कोकणात फिरवून त्याचा उपयोग होणार आहे. कोकणचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्याकरिता ही यात्रा परिवर्तनाची नांदी ठरेल, असे जठार यांनी स्पष्ट केले. पाण्याचा दुष्काळ दूर करणे, तरुणांना रोजगार, कोस्टल हायवे व विकास प्रकल्पांसाठी रिफायनरी होण्याकरिता आम्ही प्रयत्न करणे हे आमचे मुद्दे राहणार आहेत, असून ते म्हणाले

केंद्रातील भाजपच्या सरकारने अनेक विकासाभिमुख योजना आणल्या, त्या तडीस नेल्या आणि असंख्य लोकाभिमुख कामे केली. गेल्या ७ वर्षांत भरपूर समस्या समस्या सोडवण्यात यश मिळाले. या लोकांपर्यंत पोहोचून जनतेचा आशिर्वाद घ्यायचा, आपण मंत्री असलो तर जनसेवक आहोत, जनतेला नम्रपणे भेटले पाहिजे याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदार आपापल्या मतदारसंघात जनआशिर्वाद यात्रा आयोजित करत आहेत.

नारायणराव राणे हे १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावाधीत जनआशिर्वाद यात्रा करणार आहेत. यामध्ये ९ लोकसभा मतदारसंघ, ३३ विधानसभा मतदारसंघ आणि सुमारे एक हजार किलोमीटरची ही यात्रा आहे. यात्रेमध्ये आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह २०० जण सहभागी होणार आहेत. १९-२० ला मुंबई शहर, उपनगरात, २१ ला वसई, विरार, २३ पालीच्या महागणपतीचे दर्शन घेऊन यात्रा पुढे सरकेल. २३ ला संध्याकाळी मुक्काम चिपळूण, २४ ला रत्नागिरीत मुक्काम व २५ ला कणकवलीमध्ये मुक्काम आहे. त्यानंतर यात्रेची सांगता होणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, लोकसभा मतदारसंघ प्रमुख अतुल काळसेकर, राजेश सावंत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, राजू भाटलेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार आदी उपस्थित होते.