माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी; राणेंच्या आरोपाला दिले ना. एकनाथ शिंदे यांनी उत्तर

ठाणे: शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील असे सांगून माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’, हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ‘जन आशीर्वाद’ यात्रेनिमित्त वसई येथे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते उरले असून त्यांच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असे सांगितले. तसेच शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच निर्णय घेतील, असे सूचक विधान नारायण राणे यांनी केले. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहित आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*