मुंब्रा: काश्मीरमधील बैसरन येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याविरोधात बुधवारी मुंब्रा शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘दहशतवाद मुर्दाबाद, दहशतवाद्यांना फाशी द्या’ अशा घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिक, विशेषतः महिलांनी सहभाग घेतला.

आंदोलकांनी दहशतवाद्याचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला फाशी देऊन जोडे मारले. ‘दहशतवाद्यांना त्यांच्या घरात शिरून मारा’ अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.

काश्मीरच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बैसरन, ज्याला ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणूनही ओळखले जाते, येथे हा हल्ला झाला. मागील सहा वर्षांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, यामध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे. या घटनेमुळे डोंबिवलीसह संपूर्ण देशात शोककळा आणि संतापाची लाट पसरली आहे.

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी फलक झळकावले, ज्यावर ‘दहशतवाद्यांना त्यांच्या घरात शिरून मारा’ असा मजकूर होता. मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महिला आंदोलकांनी दहशतवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून आणि जोडे मारून आपला रोष व्यक्त केला.

“हल्लेखोरांना त्यांच्या अड्ड्यावर जाऊन ठेचायला हवे. निष्पापांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. सरकारने दहशतवादाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा,” असे आंदोलकांनी सांगितले. तसेच, धर्म आणि दहशतवाद यांचा काहीही संबंध नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यात ठिकठिकाणी दहशतवादाविरोधात आंदोलने सुरू असून, केंद्र आणि राज्य सरकारवर कठोर कारवाईचा दबाव वाढत आहे.