फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबई अनलाॅक; महापालिका टास्क फोर्सला शिफारस करणार

मुंबईत कोविड संसर्गावर पालिका आरोग्य यंत्रणेने चांगलेच नियंत्रण मिळविले आहे. रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. पुढील दोन आठवडे रुग्ण संख्या आणखीन कमी झाल्यास मुंबई अनलॉक करण्याबाबत टास्क फोर्सला कळविण्यात येईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबईत मार्च २०२० पासून कोविड संसर्गाने मुक्काम ठोकला आहे. कोविडची पहिली व दुसरी लाट यशस्वी उपाययोजना व उपचार यांद्वारे पालिकेने परतावून लावली. आता कोविडच्या तिसऱ्या लाटेचाही पालिका आरोग्य यंत्रणा यशस्वीपणे मुकाबला करीत आहे. त्यामुळेच अचानक वाढलेली रुग्ण संख्या आता कमी कमी होत आहे. त्यामुळे पालिकेने निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणून शाळा, कॉलेज सुरू केले. मैदाने, पार्क, प्राणीसंग्रहालय पुन्हा खुले करण्यात आले.

रुग्ण संख्या शेकड्यातून थेट २१ हजारांवर

पुढील दोन आठवडे रुग्ण संख्येचा आढावा घेऊन मुंबई अनलाॅक करण्याची शिफारस टास्क फोर्सला करणार असून, टास्क फोर्स राज्य सरकारला याबाबत योग्य ती माहिती देईल. त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल, असे काकाणी यांनी सांगितले. मुंबईत कोविडची दुसरी लाट आटोक्यात आलेली असताना काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कोविडचा संसर्ग गेल्या २१ डिसेंबरनंतर वाढला व तिसऱ्या लाटेने मुंबईत शिरकाव केला. त्यामुळे रुग्ण संख्या शेकड्यातून थेट २१ हजारांवर पोहोचली. ओमायक्रॉनचे रुग्णही जास्त प्रमाणात आढळून आले. परिणामी मुंबईत पुन्हा कोविडच्या तिसऱ्या लाटेने हातपाय पसरले. त्यामुळे मुंबईकरांसह पालिका व राज्य आरोग्य यंत्रणांचे टेन्शन वाढले होते.

मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी…

मुंबईत विविध रुग्णालयात, कोविड जंबो सेंटर आणि खासगी रुग्णालयात मिळून अंदाजे ३५ हजार बेड्स अँक्टीव्ह करण्यात आले होते. ऑक्सिजन बेड्सही काही प्रमाणात अँक्टीव्ह करण्यात आले होते. मात्र, पालिका यंत्रणेने कोविडबाबतच्या त्रिसुत्री नियमांचे पालन केल्याने आणि काही प्रमाणात निर्बंध लावल्याने तिसरी लाट ओसरायला मोठी मदत झाली. रोज २१ हजारांवर आढळणारी रुग्ण संख्या सध्या ६०० वर आली आहे. रुग्ण संख्येत घट होत असल्याने राज्य सरकार व पालिकेने मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले.

फेब्रुवारीनंतर मुंबई अनलाॅक होणार?

आता शाळा, कॉलेज, तारण तलाव, दुकाने, हॉटेल्स, पर्यटन स्थळे या ठिकाणी निर्बंध शिथिल केल्याने संबंधितांना मोठा दिलासा मिळाला. आता फक्त सिनेमागृह, रेस्टॉरंट, पब या ठिकाणी ५० टक्के उपस्थिती बंधनकारक असून पुढील दोन ते तीन आठवड्यात रुग्ण संख्येत अशीच घट होत राहिली तर फेब्रुवारी अखेरपर्यंत अथवा फेब्रुवारीनंतर मुंबई अनलाॅक होईल, असा अंदाज काकाणी यांनी व्यक्त केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*