रत्नागिरी : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सीएसआर पार्टनर असलेल्या मुकुल माधव फाउंडेशन या संस्थेद्वारे रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर रत्नागिरी पोलीसांना हेल्मेट वितरण करण्यात आले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेली 30 वर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रमांना मदत करत आहे.

यामध्ये पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, अशा गोष्टींमध्ये कार्यरत आहेत. सामाजिक बांधीलकी जपत समाजातील विविध स्तरांवर काम करणाऱ्या मुकुल माधव फाउंडेशनने समाजात गेली 25 वर्ष अविरत सेवा दिली आहे.

रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखा व पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हेल्मेट वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर टेक्निकल सौम्या चक्रबर्ती, शसागर चिवटे व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात एकूण 550 हेल्मेटचे वितरण होणार आहे.

पोलीसांसाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी आरोग्य शिबीरे व अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांचे पोलीस व्यवस्थापनाला नेहमीच सहकार्य राहिले आहे.

यापूर्वी देखील पुणे व अहमदनगर येथे अशाच प्रकारे हेल्मेट वितरण फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. आज रत्नागिरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी मुकुल माधव फाऊंडेशनला मिळत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.

वाहतूक व रस्ता सुरक्षेतेचा विचार करता रस्त्यावर होणारे अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता असते म्हणूनच हेल्मेट चा वापर अतिशय महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी केले.

भारतात होणाऱ्या अपघातांमध्ये हेल्मेट वापराअभावी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे फिनोलेक्स इंडस्ट्रीचे डायरेक्टर टेक्निकल सौम्या चक्रबर्ती यांनी अधोरेखित केले.

या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांचे आभार मानले व या उपक्रमाचे कौतुक करून मुकुल माधव फाऊंडेशनच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.