मी तर सात तारखेला दिला होता राजीनामा – मुजीब रूमाने

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहीने पक्षाचे प्रवक्ते मुजीब अलीमिया रूमाने यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. पक्षशिस्तभंगाचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रदेश कार्यालयातून जारी झालेल्या निलंबनाचं पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटक असलेल्या महायुतीच्या उमेदवारांविरोधात मुजीब रुमाने यांनी विरोधी भूमिका घेतली आहे.

त्याचबरोबर त्यांनी महायुती सरकारची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न केला आहे. हे त्यांनी जाणीवपूर्वक केलं असून ते कृत्य पक्षशिस्तीला अनुसरून नाही म्हणून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असं पत्रात म्हटलं आहे.

या पत्राची एक प्रत पक्षाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव यांना पाठवण्यात आली आहे. निलंबनाबाबत पत्र देताना संबंधित व्यक्ती किती दिवसांसाठी निलंबित करण्यात आली आहे, हे पक्षाकडून सांगितलं जातं. परंतु मुजीब रूमाने यांच्या निलंबनाच्या पत्रामध्ये ते कधीपर्यंत निलंबित राहणार आहेत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.

आचारसंहिता लागण्याच्या काही दिवसांपूर्वीच मुजीब रुमाने यांची मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

पक्षातून त्यांना जरी निलंबित करण्यात आलं असलं तरी त्यांच्याकडे महामंडळाचं सदस्यपद अद्यापही अबाधित आहे.

मुजीब रूमाने

निलंबनाचं स्वागतच – मुजीब रूमाने

मी माझ्या निलंबनाचं स्वागतच करतो, अशी प्रतिक्रिया मुजीब रूमाने यांनी माय कोकणशी बोलताना दिली आहे. पक्षाने माझं निलंबन जरी केलं असलं तरी मी माझ्या सर्व समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, मी यापूर्वीच माझ्या सर्वपदांचा म्हणजे प्रवक्ते पदाचा, विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा 7 नोव्हेंबर 2024 रोजीच राजीनामा दिला आहे. मी माझ्या विधानसभा क्षेत्र प्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे सुपूर्द केला आहे तर प्रवक्तेपदाचा राजीनामा पक्षाचे सचिव आ. शिवाजीराव गर्जे यांच्याकडे दिला आहे. राजीनामा देऊन ही जर निलंबत्व होत असेल तर त्याचं स्वागतच आहे, असंही मुजीब रूमाने म्हणाले आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये मी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांचं काम करणार आहे. मी कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे लवकरच आपल्याला कळेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

या विषयावर जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडेही आम्ही संपर्क केला त्यांनी थोडक्यात शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बाबाजी जाधव, जिल्हाध्यक्ष

मुजीब रूमाने यांनी प्रदेश कार्यालयाला राजीनामा दिला आहे की नाही हे मला माहीत नाही, एवढीच प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी दिली आहे.