दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव शुगर इन्स्टिटयुट मांजरी, पुणे यांच्यामध्ये २०२१ रोजी संशोधन, शिक्षण आणि विस्तार याबाबत सामंजस्य करार झाला असून गेल्या दोन वर्षात विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हयातील नापणे उस संशोधन केंद्र तसेच कृषि विद्या विभाग, दापोली येथे विविध संशोधनपर प्रयोग देखील घेण्यात आले आहेत.
त्याचबरोबर या सामंजस्य करारामुळे कृषि विद्या विभाग, कृषि रसायनशास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्याना वसंतराव शुगर इन्स्टीटयुट संस्थेमधील विविध सोईसुविधांचा विद्यार्थी संशोधनासाठी फायदा घेत आहेत.
या संशोधनाची आढावा बैठक दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी कुलगुरु परिषद दालन, दापोली येथे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत वसंतराव शुगर इन्स्टिटयुट मांजरी, पुणेचे महासंचालक, डॉ. संभाजी कडूपाटील, प्रमुख शास्त्रज्ञ तथा पीक उत्पादन विभागाचे प्रमुख डॉ. ए. डी. कडलग, डॉ. सुनिल दळवी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. प्रमोद सावंत इत्यादींनी सहभाग घेतला.
बैठकी दरम्यान विद्यापीठाचे उपसंचालक डॉ. संजय तोरणे यांनी सामंजस्य करारामधील विविध घटकांवर सविस्तर चर्चा केली. डॉ. प्रशांत बोडके यांनी सामंजस्य करारामधील आत्तापर्यंत झालेल्या संशोधनावर उहापोह केला. त्यानंतर डॉ. ए. डी. कडलग आणि डॉ. सुनिल दळवी यांनी आत्तापर्यंत झालेल्या संशोधनाचे सादरीकरण केले.
आत्तापर्यंत या संस्थेव्दारे एकूण चार संशोधनपर प्रकल्प राबविण्यात आले असून त्यामधून आलेल्या निष्कर्षावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी समाधान व्यक्त केले आणि कोकणामधील जास्तीत जास्त लागवडीयोग्य पडीक जमिन उस या पिकाअंतर्गत आणण्यासाठी त्याचबरोबर जमिनीची सुपिकता आणि दर्जा टिकवून ठेवण्यासाठी या संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांना उसाची शेती करण्यास नक्कीच होईल अशी अशा व्यक्त केली.
यावेळी या बैठकीला कृषि मृद व रसायनशास्त्र विभागाचे डॉ. सुरेश दोडके, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आर. एल. कुणकेरकर, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एन. जालगांवकर तसेच या प्रकल्पाअंतर्गत काम करणारे डॉ. संतोष सावर्डेकर, डॉ. संजय तोरणे, डॉ. वैभव राजेमहाडीक, डॉ. तुषार थोरात, डॉ. एस. एस. माने, डॉ. व्ही. व्ही. दळवी, डॉ. व्ही. एन. शेटये, डॉ. विजय सागवेकर, डॉ. अमित दहिफळे आदी शास्त्रज्ञ उपस्थित होते