दापोली :- फिलीपाईन्सस्थित आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (ईरी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचे दरम्यान भाताच्या संशोधनासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलीपाईन्सचे महानिर्देशक डॉ. अजय कोहली यांनी फिलीपाईन्स येथे सामंजस्य करार करण्यात आला.
दिनांक १५ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय भात परिषदेमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे आणि प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे भात पैदासकार डॉ. भरत वाघमोडे सहभागी झाले आहेत.
भात हे कोकणातले प्रमुख पीक असून कोकणातील सर्व जिल्हयामध्ये पिकवले जाते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने भातामध्ये भरीव संशोधन करुन आत्तापर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार एकूण ३५ वेगवेगळया अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसीत केल्या आहेत.
या मध्ये महाराष्ट्रातील पहिली संकरीत जात तयार करण्याचा बहुमान या विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. सहयाद्री १ ते ५ या जातींचादेखील समावेश होतो.
या दोन संस्थेमध्ये झालेला सामंजस्य करार ही अभिमानाची गोष्ट असून या करारानुसार विशेष करून भाताच्या विविध स्थानिक वाणांचे संकलन, वैशिष्टय, सुधारणा त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती, अती ताण सहन करणाऱ्या जाती तसेच विविध किडी व रोगांना बळी पडणाऱ्या जातींवर संशोधन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर जलद संकरीकरण, कृत्रिम बुध्दीमत्ता यासारख्या घटकांचा संशोधनात समावेश करण्यात येणार आहे.
त्यामुळे विद्यापीठातील भातावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना, आचार्य पदव्युत्तर आणि विद्यार्थ्यांना फिलीपाईन्स येथे जाऊन संशोधन करण्याची एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, शैक्षणीक आणि संशोधनासाठी बाहयस्त्रोताची उपलब्धता आणि या संदर्भाने विविध प्रकल्प राबविणे आता सहज शक्य होणार आहे.
हा सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील भात पैदासकार डॉ. भरत वाघमोडे यांनी पुढाकार घेतला.
या कराराच्यावेळी आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, फिलीपाईन्स येथील महानिर्देशक डॉ. अजय कोहली, आतंराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे तज्ञ मार्गदर्शक डॉ. उमाशंकर सिंग, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उपनिर्देशक डॉ. संकल्प भोसले, दक्षिण अफ्रीकेचे संशोधन समन्वयक डॉ. अजय पंचभाई, डॉ. सुधांशू सिंग, संशोधन संचालक ईरी आणि चीनचे शास्त्रज्ञ तसेच आंतराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलीपाईन्समधील कार्यरत शास्त्रज्ञ उपस्थित होते.