रत्नागिरी – अनधिकृतरित्या व्याजावर पैसे देणाऱ्या सावकारांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू करताच सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
तक्रार नको म्हणून सेटलमेंटच्या चर्चा आता सावकार आणि कर्जदारांमध्ये रंगू लागल्या आहेत.
पोलिसांच्या कारवाईने धाबे दणाणलेल्या सावकारांची कर्जमाफी सुरू झाली आहे.
पोलिसांची कारवाई सुरू होताच आणखी पाच सावकारांच्या विरोधातील तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सावकारी विरोधातील कारवाईबाबत माहिती दिली.
ते म्हणाले की, सावकारीतून गोरगरीबांची लूटमार सुरु आहे. ही रोखण्यासाठीच आम्ही कडक पावले उचलली आहेत. सर्वांचाच आम्हाला या कारवाईसाठी पाठींबा मिळाला आहे.
जिल्हा उपनिबंधक आणि पोलीस आम्ही एकत्र येऊन काम करत आहोत. आम्ही आवाहन केल्यानंतर सावकारांच्या विरोधात सुरुवातीला 10 आणि नंतर 5 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
सुरुवातीला चारजणांना अटक करण्यात आले होते, असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
सध्या निलेश कीर हा पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र तो पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही. त्याने अनेक कागदपत्रे गहाळ केली आहेत.
त्याच्या मोबाईलमध्ये आम्हाला काही व्हॉईस क्लिप मिळाल्या आहेत. त्याच्या तपासणीसाठी आम्ही निलेश कीरच्या आवाजाचे नमुने घेत होतो.
मात्र ते नमुने देण्यास त्याने नकार दिला आहे, असे सांगताना अटक होण्यापुर्वी निलेश कीरने वकिलांचा सल्ला घेतला होता असा गौप्यस्फोट जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केला.
निलेश कीर याच्याकडील वाहने जप्त केली असून ती आम्ही कर्जदारांना परत देणार आहोत. तसेच निलेश कीर याने हडप केलेली जमीन संबंधित मालकाला उपनिबंधक विभाग परत करु शकतो असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
पोलीसांनी अनधिकृत सावकारांच्या विरोधात कारवाई सुरू केल्यानंतर सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
कर्जदार तक्रार देण्यास पुढे सरसावत असल्यामुळे तक्रार नको, आपण सेटलमेंट करु अशी चर्चा आता सावकार करत आहेत.
तरीही काही तक्रारदारांनी पोलीसांकडे धाव घेतली आहे. पोलीसांनी रत्नागिरीत फोफावलेल्या सावकारीचा बिमोड करण्याचा विडा उचलला आहे.
अनधिकृत सावकारीचा हा व्यवसाय केवळ रत्नागिरी तालुक्यापुरता मर्यादित नसून त्याचा पसारा जिल्हाभर आहे.
जिल्ह्यातील हे असे अनधिकृत सावकारी करणारे पोलीसांच्या रडारवर आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, पुढील काळात आम्ही चिपळूण आणि खेडमध्येही सावकारीविरोधात कारवाई करणार आहोत.