दापोली: महाराष्ट्रातील तसेच दापोली मतदारसंघातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता या संबंधित उपाययोजनांबाबत दापोली विधानसभा मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खेड, दापोली व मंडणगड तालुक्याची आढावा बैठक घेतली आणि उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटर उभारण्याची आणि येत्या २ दिवसात बेडची संख्या वाढविण्याची सूचनादेखील केली. तसेच केंद्र सरकारने आपल्याला लस कमी दिल्या आहेत, त्या तुटवड्याअभावी जी लसीकरण केंद्रे उभारली होती, ती देखील बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. तरी मी स्वत: लवकरात लवकर पाठपुरावा करून लसीकरण केंद्र सुरू करून जोमाने लसीकरण करण्याचा मानस यावेळी बोलून दाखवला आणि त्या संदर्भात सूचनाही केल्या आहेत. दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिलांची प्रसूती चांगल्या पद्धतीने व्हावी आणि लवकरात लवकर व योग्य दर्जाचे उपचार महिलांना मिळावेत. तसेच ग्रामीण भागातील जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तिथे ग्रामीण भागातील महिलांची प्रसूती त्या-त्या केंद्रावर व्यवस्थित झाली पाहिजे. या संदर्भातील उपाययोजना लवकरात लवकर व्हाव्यात अशी सूचना
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांना प्रसूतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते, त्यांची प्रसूती ते वास्तव्य करत असलेल्या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात सुरळीतपणे झाली तर त्यांच्या समस्या कमी होणार आहेत. प्रामुख्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे आणि त्यासाठी सक्तीचे प्रयत्न सर्वांनी करावे तसेच सर्व व्यापारी बांधवांनी नियम पाळावेत आणि लॉकडाऊनचे पालन करत या महामारीला लवकरात लवकर पराभूत करू असे आवाहनही केले.
आपले कुटुंब जशी आपली जबाबदारी आहे, तसेच आपले शहर, खेड, दापोली व मंडणगड परिसर देखील आपली स्वतःची जबाबदारी आहे. असे समजून लॉकडाऊनच्या नियमांचे सर्वांनी पालन करूया आणि ही महामारी रोखण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करूया असे आवाहन आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने जनतेला केले आहे. सदर बैठकीला नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांसहीत अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.