गुहागर: काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “या क्रूर हल्ल्यामागील दहशतवाद्यांना सरकारने चांगलाच धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या घरात घुसून त्यांचा खात्मा केला पाहिजे,” असे ठाम मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले.
आमदार जाधव यांनी पुढे सांगितले की, दहशतवादी पोलिसांच्या वेशात पर्यटकांमध्ये मिसळले होते आणि ते हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करत पर्यटकांवर गोळीबार करत होते. या हल्ल्याने देशातील सुरक्षा यंत्रणेची ढिलाई पुन्हा एकदा समोर आली आहे, असेही ते म्हणाले. “आपली सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांना कठोर शासन करण्यासाठी आम्ही सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत,” असे जाधव यांनी स्पष्ट केले.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दहशतवाद्यांना त्यांच्या अड्ड्यावर जाऊन धडा शिकवावा, अशी मागणीही त्यांनी केली. “हा हल्ला करणाऱ्यांना सोडता कामा नये. सरकारने त्यांचा कठोरपणे बंदोबस्त करावा,” असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी शेवटी केले.