
रत्नागिरी: चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘अग्निपंख’ या नाटकासाठी राज्यस्तरीय अभिनयाचे प्रथम पारितोषिक पटकवणारे रत्नागिरीचे सुपुत्र मिनार पाटील यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) नाट्य विभागाच्या समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे.
मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात आयोजित ‘कोमसाप’च्या ३५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात हा सन्मान सोहळा पार पडला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते मिनार पाटील यांना मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
याच प्रसंगी त्यांना निवडीचे अधिकृत पत्रही प्रदान करण्यात आले.
यशाचा प्रवास:
समर्थ रंगभूमी संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या, प्र. ल. मयेकर लिखित ‘अग्निपंख’ या नाटकाने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरावर धडक मारली होती.
या नाटकात मिनार पाटील यांनी साकारलेल्या दमदार भूमिकेसाठी त्यांना राज्यस्तरावरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान मिळाला.
मिनार हे कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांचे सुपुत्र आहेत.
या कौतुक सोहळ्याला कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, विश्वस्त एल. बी. पाटील यांच्यासह साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मिनार यांच्या या निवडीमुळे रत्नागिरीच्या नाट्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply