पाली (प्रतिनिधी): मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शालेय स्वराज्य सभा (माध्यमिक विभाग) निवडणूक यशस्वीपणे पार पडली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही सहभागातून विविध पदाधिकारी निवडले गेले असून, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण जोपासण्यासाठी या सभेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदी आध्या राजेंद्र कृतडस्कर (दहावी अ) यांची निवड झाली. सांस्कृतिक मंत्रीपदी आयेशा अजिज पेजे, क्रीडा मंत्रीपदी रितेश राजाराम सावंत, सहल मंत्रीपदी समर्थ दिलीप खानविलकर, शिस्त मंत्रीपदी यश रमाकांत गिडीये, आरोग्य मंत्रीपदी आर्यन विजय सावंत, पर्यावरण मंत्रीपदी श्रवण दीपक पवार, स्वच्छता मंत्रीपदी श्रेया समीर शिगवण, ग्रंथालय मंत्रीपदी मनस्वी शंकर नागले आणि विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून श्रावणी दीपक पवार यांची निवड करण्यात आली.
निवड प्रक्रिया पारदर्शक आणि यशस्वी व्हावी यासाठी शालेय स्वराज्य सभेचे प्रमुख तुफिल पटेल यांनी मार्गदर्शन करून संपूर्ण कामकाज सांभाळले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया अत्यंत व्यवस्थितपणे पार पडली.
शाळेचे मुख्याध्यापक कुशाबा करे, पर्यवेक्षिका नम्रता गोगटे तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.