पुणे : यवतमाळ, चिपळूण आणि आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतही ‘ट्रेड विथ जाझ’ (TradeWithJazz – TWJ) या कथित गुंतवणूक कंपनीविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे, पुण्यातील कर्वेनगर पोलीस ठाण्यात कंपनीच्या २३ प्रतिनिधींवर ६ कोटी १० लाख २८ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, या घटनेमुळे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे, गुरुवारी २ ऑक्टोबर रोजी कर्वेनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला, ‘TWJ’ कंपनीने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे तक्रारीत नमूद आहे,
आरोपींमध्ये कंपनीचा मूळ संचालक समीर नार्वेकर (रा. TWJ, पुणे, वारजे माळवाडी), त्यांची पत्नी नेहा समीर नार्वेकर यांच्यासह प्रतिक जासतकर, रोहित मस्के, मुनाफ मुकादम, स्वप्निल पवार, अमित विश्वनाथ बालम, किरण कुंडले, सुरज सँकासने, प्रणव बोरडे, संकेश घाग, सिद्धेश पाटील, अविनाश कदम, सचिन पाटील, देवा घाणेकर, स्वप्निल देवळे, सौरभ गोरडे, प्रसन्ना मंगेश करंदीकर, मोहन कोरगांवकर, माहेश्वरी पाटणे, रघूवीर महाडीक, ऋषीकेश सुधीर पाटील, सोनाली पाटील यांचा समावेश आहे,
‘TWJ’ ने अल्प काळात मोठे आर्थिक फायदे मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांना ट्रेडिंग आणि गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले, सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा मिळाल्याने त्यांनी अधिक रक्कम गुंतवली, मात्र नंतर परतावा थांबला आणि फसवणुकीचा प्रकार उघड झाला, राज्याच्या विविध भागांतून ‘TWJ’ विरोधात तक्रारी वाढत असताना पुण्यातील या मोठ्या घोटाळ्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता आणि संताप पसरला आहे, पुणे पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,