मुंबई : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट नोंदवली गेली असताना, महाराष्ट्राने मात्र या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.

सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) ताज्या अहवालानुसार, २०२४ मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले आहे.

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी डिसेंबर २०२४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर लागू केलेल्या क्रांतिकारी निर्णयांचा हा परिणाम आहे.

राणे यांनी अवैध मासेमारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली. त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ड्रोन कॅमेरे बसवणे.

या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे परराज्यातून येणाऱ्या अवैध मासेमारीला आणि बेकायदेशीर एलईडी मासेमारीला आळा बसला आहे.

अवघ्या पाच महिन्यांत या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून, राज्याच्या मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.

२०२४ मध्ये देशाचे एकूण मत्स्योत्पादन ३४.७ लाख टनांवर घसरले, तर २०२३ मध्ये ते ३५.३ लाख टन होते, म्हणजेच यंदा २ टक्के घट नोंदवली गेली.

अशा आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्राने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटक, गोवा, दमण आणि दीव यांसारख्या राज्यांमध्ये मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्राने ४७ टक्के वाढीसह आघाडी घेतली आहे.

पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्येही चांगली कामगिरी दिसून आली असून, पश्चिम बंगाल (३५ टक्के), तमिळनाडू (२० टक्के) आणि ओडिशा (१८ टक्के) यांनी उत्पादनात वाढ नोंदवली आहे.

२०२४ मध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात सर्वाधिक बांगडा मासे आले असून, त्यांचे उत्पादन २.९३ लाख टनांपर्यंत वाढले आहे. तारळीचे उत्पादन २.४१ लाख टनांपर्यंत पोहोचले असून, पेडवे आणि मांदेली यांसारख्या माशांचेही उत्पादन वाढले आहे.

मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील या प्रभावी उपाययोजनांमुळे महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला विश्वास राणे यांनी सार्थ ठरवला असून, भविष्यातही या क्षेत्रात मोठी प्रगती अपेक्षित आहे.