नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
७ जुलै २०२५ रोजी झालेल्या या निवडणुकीत अभाविपने ८ पैकी ५ जागांवर विजय मिळवत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) स्टुडंट्स फोरमचा दारुण पराभव केला आहे.
विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपदावर अभिजीत वाकचौरे (संगमनेर), उपाध्यक्षपदावर सुजाता कांबळे (अंबेजोगाई) आणि सचिवपदावर चैतन्य कावळे (संगमनेर) यांनी विजय मिळवला.

सिनेटच्या ३ पैकी २ जागांवर अभाविपचे उमेदवार पियूष निंबाळकर (नाशिक) आणि उत्तरेश्वर दराडे (धुळे) विजयी झाले.
या घवघवीत यशामुळे अभाविप कार्यकर्त्यांनी फटाके आणि ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. यानंतर रा. स्व. संघ कार्यालयात भारतमाता पूजनाचा कार्यक्रम पार पडला.
विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
अभाविपचे विजयी उमेदवार वैद्यकीय, नर्सिंग, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतवैद्यकीय आणि पॅरामेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रवेश, परीक्षा व निकालांमधील विलंब टाळण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अधर्व कुलकर्णी म्हणाले, “देशभरातील छात्रसंघ निवडणुकांमध्ये अभाविपने राष्ट्रीयत्वाचा विचार घेऊन यश मिळवले आहे.
हीच परंपरा कायम ठेवत MUHS मध्येही अभाविपने विजय मिळवला. विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”